
कोल्हापूर, दि. ३ ऑगस्ट २०२६
कोल्हापूरमधील समस्त नाट्यकर्मी, रंगकर्मी, शाहूप्रेमी आणि कलाप्रेमी यांच्या वतीने गेल्या काही दिवसांपासून संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचे खासगीकरण/बाह्य व्यवस्थापन आणि नाट्यगृहाचे प्रस्तावित भाडेदर या महत्त्वाच्या विषयांवर आंदोलन सुरू होते.
या आंदोलनादरम्यान कोल्हापूर महानगरपालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी तसेच विविध मान्यवरांशी सातत्याने चर्चा झाली. अखेर कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी रंगकर्मींच्या प्रमुख मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत लेखी मान्यता दिली आहे. त्यांच्या पत्रानुसार नाट्यगृह कोणत्याही एका संस्थेला संपूर्णपणे चालविण्यास देण्याचा महानगरपालिकेचा निर्णय झालेला नाही आणि होणार ही नाही. फक्त दैनंदिन व्यवस्थापनासाठी पारदर्शक निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असून कार्यक्रमांचे दर व निविदेचा मसुदा याबाबत महानगरपालिका प्रशासन, महापौर व संबंधित पदाधिकाऱ्यांच्या समवेत चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. जे रंगकर्मी नी सुचवल्याप्रमाणे असेल.
तसेच रंगकर्मींनी महानगरपालिकेसमोर मांडलेल्या भूमिकेमध्ये नाट्यगृहाची मालकी, धोरणात्मक नियंत्रण, आरक्षण व्यवस्था, नियम व महसूल महानगरपालिकेकडेच राहावा; दैनंदिन व्यवस्थापन आवश्यक असल्यास पारदर्शक निविदेद्वारे पात्र संस्थेकडे देता येईल, तसेच कलाकार व सांस्कृतिक संस्थांसाठी परवडणारे भाडेदर असावेत, अशी स्पष्ट भूमिका मांडण्यात आली होती. जी मान्य करण्यात आलेली आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर आणि आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी केलेल्या लेखी विनंतीचा मान राखून, समस्त रंगकर्मींच्या वतीने सुरू असलेले आंदोलन आजपासून स्थगित करीत आहोत, असे या प्रेस नोटद्वारे जाहीर करीत आहोत.
चर्चेअंती रंगकर्मींच्या वतीने महानगरपालिकेस सादर करण्यात आलेले निवेदन तसेच मा. आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिलेले लेखी पत्र या प्रेस नोटसोबत जोडत आहोत.
आमची भूमिका आजही स्पष्ट आहे
हे आंदोलन कोणत्याही राजकीय पक्षाच्या बाजूने किंवा विरोधात नव्हते. कोणत्याही व्यक्ती अथवा संस्थेच्या विरोधातही नव्हते.
हे आंदोलन केवळ रंगकर्मींच्या हक्कांसाठी, संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचे सार्वजनिक व सांस्कृतिक स्वरूप अबाधित ठेवण्यासाठी आणि कोल्हापूरच्या सांस्कृतिक हितासाठी होते.
या आंदोलनाच्या काळात विविध चर्चा झाल्या. काही आरोप-प्रत्यारोप झाले, काही समज-गैरसमजही निर्माण झाले. मात्र आता ते सर्व विषय तिथेच सोडून देऊन ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या कोल्हापूरच्या सांस्कृतिक उज्ज्वल भविष्यासाठी सर्वांनी पुन्हा एकत्र यावे, असे आवाहन आम्ही करीत आहोत.
या संपूर्ण आंदोलनामध्ये आम्हाला मदत करणाऱ्या, मार्गदर्शन करणाऱ्या आणि आमच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहिलेल्या प्रत्येकाचे आम्ही मनःपूर्वक आभारी आहोत.
विशेषतः मा. खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.
संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह पुन्हा उभे राहावे यासाठी सुरुवातीपासून रंगकर्मींच्या पाठीशी उभे राहिलेले मा. आमदार राजेश क्षीरसागर यांचेही मनःपूर्वक आभार.
तसेच कोल्हापूरच्या मा. महापौर रुपाराणी निकम आणि मा. आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी रंगकर्मींच्या भावना व भूमिका समजून घेत सकारात्मक प्रतिसाद दिला आणि प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला, याबद्दल त्यांचे विशेष आभार.
मा. खासदार धनंजय महाडिक साहेब यांच्या रंगकर्मीनच्या बाजूनी घेतलेल्या भूमिकेबद्दल आभार.
राजू लाटकर आणि विजय देवणे यांचेही सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार.
मा. राजे समरजितसिंह घाटगे यांचेही सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार.
शेतकरी कामगार पक्षाचे बाबुराव कदम, जगदाळे साहेब, वसंतराव मुळीक, संदीप देसाई(आप ), हर्षल सुर्वे, इंद्रजीत सावंत, तसेच सर्वच पक्षांचे संघटनांचे पदाधिकारी, कोल्हापूर आणि महाराष्ट्रातील जवळ जवळ 40 ते 50 संघटना संस्था यांनी पाठिंबा दर्शवला यांचेही मनःपूर्वक आभार.
आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या आंदोलनामध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागी झालेले समस्त नाट्यकर्मी व रंगकर्मी, कलाप्रेमी रसिक, शाहूप्रेमी, कोल्हापूरची जनता, सामाजिक-सांस्कृतिक संस्था, विविध संघटना, सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आणि पत्रकार बंधू-भगिनी यांचे आम्ही मनापासून आभार मानतो.
सर्व वृत्तपत्र प्रिंट मीडिया व्हिडिओ मीडिया आणि सोशल मीडिया न्यूज चॅनेल यांचे आम्ही मनापासून आभार मानतो.
आंदोलन स्थगित होत आहे; पण संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचे सांस्कृतिक हित, कलाकारांचे हक्क आणि कोल्हापूरच्या जनतेचे हित जपण्याची आमची भूमिका कायम राहील.
“खासगीकरण नको — सक्षम, पारदर्शक व्यवस्थापन हवे.”
संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह कोणत्याही व्यक्तीचे, संस्थेचे किंवा पक्षाचे नाही — ते कोल्हापूरचे आहे.
– आनंद काळे
– किरणसिंह चव्हाण
– प्रसाद जमदग्नी
– सुनील घोरपडे
– रोहन घोरपडे
आणि समस्त नाट्यकर्मी / रंगकर्मी / शाहूप्रेमी, कोल्हापूर








