
अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य मानवी संवेदना जागवणारे साहित्य असून, कष्टकरी शोषित कामगार यांच्या रोजच्या जगण्याचे प्रतिबिंबत्व करणारे साहित्य म्हणजे अण्णाभाऊंची लेखणी होय, असे प्रतिपादन विद्रोही कवी नितीन चंदनशिवे यांनी केले. इचलकरंजी येथील जयवंत महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. डी वाय जमादार होते.
यावेळी पुढे बोलताना चंदनशिवे म्हणाले की, आजकालचे कार्यक्रम पाहता अण्णाभाऊंना आणि त्यांच्या साहित्याला सोन्याचे दिवस आले असे म्हणावे लागेल, अण्णाभाऊंच्या साहित्याची दखल फारशा लोकांनी घेतली नाही मात्र त्याच्यानंतर आज अण्णाभाऊंच्या साहित्याला सोन्याचे दिवस आले आहेत असे वातावरण वाटत आहे.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ डी वाय जमादार म्हणाले की, अण्णाभाऊंच्या साहित्याचा विविध दृष्टिकोनातून साहित्यिक आणि अकादमीक अभ्यास होणे आवश्यक आहे.
स्वागत सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. कपिल राजहंस यांनी तर पाहुण्यांचा परिचय डॉ. वसंत भागवत यांनी करून दिला. डॉ. वैशाली चौगुले यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी इचलकरंजी शिक्षण शास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ उर्मिला पाटील, जिमखाना विभाग प्रमुख डॉ. येवन आवळे, डॉ. मोहन जोशी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.




