सातारा : कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे साताऱ्यातील वाई येथील कृष्णा नदीला मोठा महापूर आला आहे. पुराचे पाणी प्रसिद्ध श्री महागणपती (ढोल्या गणपती) मंदिराच्या पायऱ्या आणि आवारापर्यंत पोहोचल्याने सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाने मंदिर भाविकांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दुर्दैवाने आजच संकष्टी चतुर्थी असल्याने दर्शनासाठी आलेल्या हजारो भाविकांचा मोठा हिरमोड झाला. मात्र भाविकांनी मंदिराच्या बंद दरवाजातूनच दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. वाई तालुक्याचा पश्चिम भाग, जोर-जांभळी खोरे आणि महाबळेश्वर परिसरात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे धोम आणि धोम-बालकवडी ही दोन्ही धरणे पूर्ण भरली आहेत. सुरक्षेचा उपाय म्हणून धोम धरणातून शनिवारी रात्री १० वाजेपासून १०,४६५ क्युसेक्स वेगाने पाणी कृष्णा पात्रात सोडण्यात येत आहे. परिणामी, नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्यानंतर दरवर्षीच काही दिवस मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात येते. संकष्टी चतुर्थीचा मुहूर्त साधत पहाटेपासूनच वाईत भाविकांनी गर्दी केली होती. मात्र, मुख्य मंदिराचे दरवाजे बंद असल्याने भाविकांना दुरूनच दर्शन घेऊन परतावे लागले. एकीकडे मंदिरात जाता येत नसल्याने नाराजी होती, तर दुसरीकडे पाण्याचा प्रवाह पाहण्यासाठी घाटावर भाविकांनी नागरिकांनी तुफान गर्दी केली होती. महिलांनी पूरपरिस्थितीदरम्यान कृष्णा नदीची पूजा करून पारंपरिक पद्धतीने ओटी भरली. यामुळे महागणपती घाटाला जत्रेचेच स्वरूप आले होते.परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने घाट परिसरात कडक बंदोबस्त तैनात केला आहे. पुराच्या पाण्याच्या जवळ न जाण्याचे व सुरक्षित अंतर ठेवण्याचे आवाहन प्रशासनाकडून आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.




